52 आठवडे गुणिले नवोदित दिग्दर्शक/ निर्माते = 100 सिनेमे
आजवरच्या माझ्या सिनेमाच्या प्रवासात एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, की आज कोणीही येऊन चित्रपट दिग्दर्शन करीत आहे. दुय्यम सहायक दिग्दर्शक असतो तोही सिनेमा दिग्दर्शित करायला सुरूवात करतो. खरे तर त्याला कोणत्याही तांत्रिक गोष्ट माहीत नसतात आणि हा माझा हल्लीचा अनुभव आहे. याहून दुर्दैवी बाब म्हणजे जशी दत्तांच्या बाजूला कुत्री तशी या सो कॉल्ड दिग्दर्शकांकडे निर्माती असतात. या लोकांना लगेच निर्माते कसे मिळतात हे त्यांचं त्यांना ठावूक. एका वर्षात दोन/दोन सिनेमांचं दिग्दर्शन करणं यांना कसे बरे जमते? हे लोक असे धाडस कसे करू शकतात? याचेच मला नेहमी आश्चर्य़ वाटते.
हा आता या दिग्दर्शकांच्या धाडसी वृत्तीमुळे सध्या वर्षाला 100 च्या वर सिनेमे तयार होतात. मग हेच सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी एकमेकांत स्पर्धाच सुरू होते. स्पर्धेला सुरूवात झाली की यांतीलच काहीजणांना जाग येते. चर्चा सुरू होते, मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाही. मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही. या सगळ्यात चित्रपटांच्या संख्येचा कोणी विचारच करीत नाही. जर ही संख्या कमी झाली तर स्पर्धा आपोआप कमी होईल. चित्रपटांच्या स्पर्धेच्या या जगात सगळेच लसावी मसावी करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु बेरीज वजाबाकीचं हे गणित आम्ही अजून शिकलोच नाही. असं झालं तर लोकांनाच चार दर्जेदार सिनेमांचा आस्वाद घेता येईल असे मला वाटते. मकरंद अनासपुरेंनी मागे महाराष्ट्र शासनाला यावर एक उपायही सांगितला होता. आपल्याकडची नाट्यगृहे आहेत जी फक्त शनिवार आणि रविवार चालू असतात, तिथे जर इतर दिवशी आपण स्क्रीन आणि प्रोजेक्टरची सोय केली तर सिनेमागृह खुले होईल. ज्याचा खूपच फायदा होऊ शकतो. आता हा उपाय शासनाने किती मनावर घेतला मला माहीत नाही.
आजवर मी 103 मराठी सिनेमांमध्ये काम केलं, 42 हिंदी सिनेमांमध्ये काम केलं, प्रत्येक चित्रपटाचा अनुभव हा वेगवेगळा असायचा. इतक्या दिग्गज लोकांसोबत काम केल्यानंतर जाणवू लागलं कि अरे हे काय चाललंय? नवीन दिग्दर्शक किंवा निर्माते येऊ नयेत किंवा त्यांनी सिनेमे तयार करू नयेत हा माझा मुद्दाच नाहीये. फक्त सिनेमा करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींचं ज्ञान त्यांनी घेणं मला आवश्यक वाटतं. किमान त्यांनी काही भल्या माणसांकडे जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, त्या भल्या माणसांमध्ये आवर्जून उल्लेख कारेन तो महेश मांजरेकर, परेश मोकाशी, संजय जाधव, सतीश मानवर यांचा. किंवा आपल्या मराठी सिनेसृष्टीसाठी काम करणाऱ्या आणि बोटावर मोजता याव्या अशा लाईन प्रोडक्शन कंपन्या आहेत (चांगल्या) त्याचं मार्गदर्शन हे नक्कीच घेऊ शकतात. जेव्हा या सगळ्या गोष्टी योग्य जुळून येतात तेव्हाच एखादा सैराट, दुनियादारी, नटसम्राट होतो. त्यामुळेच सिनेमा फक्त बनवू नये तर तो समजून घ्यावा.
आजकाल मला सगळे ‘घोस्ट डायरेक्टर’ म्हणतात. या गोष्टीचं मला कधी वाईट वाटलं नाही एखादा माणूस चुकत असेल तर त्याला योग्य दिशा दाखवणं मी माझं कर्तव्य समजतो. मात्र काहीजणांना याचा भयंकर त्रास होताना मी पाहिला आहे. अक्षय कुमार सोबत काम करत असताना आलेला एक विलक्षण अनुभव मला आजचा पिढीतील लोकांना सांगावासा वाटतो, जेव्हा अक्षय कुमार सेट वर यायचा तेव्हा तो कधीच त्याचा सीन संपेपर्यंत सेटवरून जात नसे, एकदा मीच त्याला स्वतःहून म्हणालो कि वेळ आहे तर व्हॅनिटी मध्ये जाऊ काही खाऊन घेऊ पण व्हॅनिटी लोकेशन पासून खूप आत होती. तर तो म्हणाला “जयवंतजी
कैसा है ना अगर मे दस बार जाउंगाना तो मेरा सव्वा घंटा उसमेही चला जायेगा. और मेरे साथ इससे जुडे सबका टाइम वेस्ट होगा” दुर्दैवाने अशी मानसिकता आपल्याकडे बाळगणारे फार कमी भेटतात. आणि व्हॅनिटी मध्ये जाऊन बसण्यात त्यांना अपार कौतुक वाटतं. दिगदर्शक, निर्मात्यांचा वेळ आणि पैसा सत्कारणी लावणं हे ना त्यांना जमत ना आम्हाला.
म्हणूनच या क्षेत्रात येणाऱ्या नवनव्या दिगर्शक तसेच निर्मात्यांना या क्षेत्राचे योग्य ते मार्गदर्शन मिळणे किंवा त्यांनी रितसर सर्व गोष्टींचे तांत्रिकदृट्या शिक्षण घेणे अतिशय महत्त्वाचे आहे जेणेकरून 52 आठवडे
आणि 100 सिनेमांचं गणित जरा सोपं होईल.
-Written by Actor Jaywant Wadkar.
[pssc_all] Shares