सगळ्यांना सगळं येतंय!
आज सोशल मीडियाच्या काळात एका क्लिक वर सिनेमाचा फर्स्ट लूक जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या ऑडियन्सला दिसतो. त्याच लूक वर लोक त्या सिनेमाची दखल घ्यायची की नाही ते ठरवून मोकळे होतात.. सिनेमा शूट करायला शे दोनशे क्रीएटीव्ह लोकांची टीम दोन तीन महिने राबते.. त्या आधी लेखक दिग्दर्शक कित्येक महिने.. वर्ष सुद्धा राबत असतात. इतक्या लोकांची मेहनत आणि निर्मात्याची काही कोटीतील गुंतवणूक! ‘फर्स्ट लूक’ बघून प्रेक्षक एका सेकंदात ठरवतो की या सिनेमाची दखल घ्यायची कि नाही. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन! हे फर्स्ट इम्प्रेशन बनवायचं काम किती जबाबदारीचं आणि जोखमीचं आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. काही लोकांना ते तसं वाटत नाही. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे सो प्रत्येकालाच वाटतंय की आपण स्वतः कमाल फोटोग्राफर आहोत. ( रघु राय सारखा आयुष्यभर फोटोग्राफी केलेला जगप्रसिद्ध माणूस म्हणतो की मला अजून शिकायचं आहे) तसंच आजकाल सोशल मिडियामुळे प्रत्येकाला आपल्याला आर्ट मधलं पण कळतं असं वाटायला लागलंय थोडक्यात काय तर ‘सगळ्यांना सगळं येतंय’ असं वाटायचा काळ आलाय.
सध्या मराठी फिल्म इंडस्ट्री मधे प्रोफेशनल नव्हे तर हौशी निर्माते खूप झालेत. त्यांना ग्लॅमरचं आकर्षण म्हणून फिल्म बनवायची असते किंवा कोणीतरी उकसवलेलं असतं ‘अमका फिल्म बनवतोय तर साहेब तुमी काय कमी आहे काय’… या निर्मात्यांना फिल्म मेकिंग मधलं ओ की ठो माहित नसतं पण त्यांनी एक सुपरहिट ब्लॉकबस्टर फिल्म बनवायची असं ठरवलेलं असतं. ते मुहूर्तापासूनच त्या सुपरहिट फिल्मचे निर्माते बनतात. ‘बनचुके’. अशा सुपरहिट निर्मात्यासोबत त्यांचे 3-4 कार्यकर्ते कम सायटर असतात. आपण त्यांना साईडहिरो म्हणूया.. तर हे साईडहिरो साहेबांना खुश करण्यासाठी डिझाईनमधे उगाचच काहीतरी करेक्शन काढतात.. उगाचच एखादा रंग वापरायला सांगतात.. मग साहेब साईडहिरोची मर्जी राखण्यासाठी डिझाईन बदलायला सांगतात… बऱ्याच वेळा हा साहेबांच्या इगोचा विषय होऊन बसतो. इगो पुढे त्यांना मग चूक बरोबर काही दिसत नाही. “मी सांगतोय म्हणून अमुक रंग टाका”… डिझाईन मधे जर एखादा रंग वापरलाय तर त्यामागे काहितरी विचार असतो. प्रत्येक रंगाला, त्याच्या प्रत्येक शेड ला एक अर्थ असतो, एक इमोशन असते, एक एनर्जी असते, मूड असतो! उगाच लहर म्हणून आम्ही कोणताही रंग किंवा त्याची शेड वापरत नसतो.
‘फर्स्ट लुक’ किंवा फिल्म पब्लिसिटी चं इतकं महत्वाचं काम कोणाकडून करून घ्यावं?
आजकाल गल्लोगल्ली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट निघालियत… एक दोन महिन्यात फोटोशॉप शिकून शेकडो मुलं मार्केट मधे स्वतःला कलाकार (आर्टिस्ट) समजून येत आहेत (त्यात या मुलांची पण काही चूक नाही, इन्स्टिट्यूट मधे प्रवेश घ्यावा म्हणून इन्स्टिट्यूटवाल्यानेच त्यांना ते स्वप्न दाखवलेलं असतं…) आणि ते कमी किमतीत किंवा काही वेळेस फुकट पण काम करतात. आपल्याकडची ‘फुकट ते पौष्टिक’ मानसिकता तुम्हाला तर माहीतीच आहे. एखाद्या चांगल्या पिकात तण वाढावं तसं या दोन महिन्यात तयार होणाऱ्या फोटोशॉप डिझायनर लोकांचं झालंय. शेतकरी तण काढून टाकतो किंवा फक्त पीक कापून घरी आणतो. कोणत्या शेतकऱ्यानं तण कापून घरी आणलेलं ऐकलंय का?आणि तसं केलं तर त्याला काय म्हणतील? गृहिणी साधी भाजी आणायला जरी मंडईत गेली तरी मोलभाव करून चांगलीच भाजी आणते, कोणी फुकट दिली तरी कुजलेली किडलेली भाजी आणत नाही.. मग चित्रपट निर्माते असं का वागत असतील?
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यासोबत माझे आजोबा जनार्दन यशवंत गुरव (जनार्दन बावडेकर असं त्यांचं टायटल्समध्ये नाव यायचं) काम करायचे त्यानंतर ते प्रभात फिल्म कम्पनी मध्ये दामले फत्तेलाल यांच्या सोबत सहाय्यक कला दिग्दर्शक होते. अशा आजोबांच्या संस्कारात वाढलो. त्यांच्यामुळेच कलाक्षेत्राची आवड लागली. संस्कारच तसे झाले. चांगलंच काम करायचं. कोल्हापूरात कलेचं रीतसर अकॅडेमिक शिक्षण घेऊन १९९९ साली मुंबईत आलो. ग्राफिक डिझायनर म्हणून काही ठिकाणी काम केलं. पण मन रमलं नाही. मनात होता फक्त सिनेमा! पब्लिसिटी डिझाईन मधील माझे पहिले गुरू विश्राम सावंत. त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करायचो तेव्हाच रामुजींची ओळख झाली. मी आज जे काम करतोय ते राम गोपाल वर्मांमुळे! त्या माणसानं संधी दिली विश्वास दाखवला म्हणून! तेव्हा मी प्रोडक्शन डिझायनर अपर्णा सूद यांच्याबरोबर सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम करत होतो, मी एक नवखा मुलगा… कितीतरी दिग्गज मंडळी समोर असताना माझ्यातले कलागुण ओळखून त्यांनी माझ्यावर ‘निशब्द’ या त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या पब्लिसिटीची जबाबदारी टाकली. अमिताभ बच्चन लीड रोल! मी फुल्ल शॉक! पण रामूजींनी मला कधीच असं सांगितलं नाही की मला असंच हवंय, तसंच हवंय.. एकदा ब्रीफ दिलं की ते फ्रीडम द्यायचे. हेच महत्वाचं आहे. आज हिंदी फिल्म इंडस्ट्री मधील चांगलं काम करणारी जवळपास सगळी माणसं रामूजींकडे तयार झालीयेत.
रामूजींसोबत काम केले तेव्हा सिनेमा ‘फिल्म फॉरमॅट’ वर बनायचा. फिल्म रोल ची कॉस्ट खूप असल्याने फुटेज वाया गेलेलं परवडायचं नाही. ते खर्चिक असूनही काय शूट झालंय ते लॅब मधून प्रिंट आल्यावरच कळायचं. त्यामुळे कामात चोखपणा लागायचा. सुरुवातीलाच या पद्धतीत शिकल्यामुळे माझ्या कामात पण फिनिशिंग आले. आता डिजिटल माध्यमामुळं काय शूट झालंय ते लगेच स्क्रीन वर दिसतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना कामाचं गांभीर्य नसतं. कोणाचं चुकतंय किंवा मी कसा भारी आहे हे दाखवण्यासाठी मी हे सांगत नाहीए.
‘राम गोपाल वर्मा की आग’ सिनेमाच्यावेळी मी रामुजींकडे परत एकदा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मागायला गेलो तेव्हा ते म्हणाले की तुला असिस्टंट का व्हायचं आहे? मी म्हणालो मला दिग्दर्शक व्हायचंय! ते म्हणाले जे मला सांगायला दोन तास लागतात ते तर तू एका पोस्टर मधे सांगतोस… हे पण दिग्दर्शनच आहे की.. तू तेच काम कर! सो रामुजींमुळेच मी आज या ठिकाणी पोचलोय.
मराठी सिनेमांचा रस्ता माझा मित्र सुनील गुजर याच्यामुळे मिळाला, त्याने सुनील भोसलेची ओळख करून दिली. सुनीलमुळे बऱ्याच मराठी सिनेमाचं काम उमेदीच्या काळात मिळालं. सहारा, के सेरा सेरा, यूटीव्ही, रिलायन्स, ऍडलॅब्स, बालाजी, फँटम, वायकॉम, विशेष फिल्म्स, फॉक्स स्टार स्टुडिओ, इरॉस, एस्सेल व्हिजन, झी स्टुडिओज याचबरोबर मराठी मधील नामवंत प्रोडक्शन्स सोबत काम करताना खूप खूप शिकायला मिळालं. नाझ बिल्डिंग मधे बसणारे डिस्ट्रिब्युटर्स सुद्धा सिनेमाचं कोणतं पोस्टर ऑडियन्स ना आकर्षित करतं याचं बाळकडू देऊन गेले! काही व्हिजनरी निर्माते आणि दिग्दर्शक( सिरीयस मेकर्स ) यांच्याकडून पण खूप शिकलो. मी काम करताना निर्माता कोण आहे… सिनेमा मोठा आहे की लहान आहे हे कधीच बघत नाही. माझ्या डोक्यात फक्त फिल्म योग्य प्रकारे रिप्रेझेन्ट व्हायला पाहिजे एवढंच असतं.
सलग चौदा वर्षे फक्त सिनेमाच्या पब्लिसिटी डिझाईनचं काम करतोय. मी पब्लिसिटी केलेल्या हिंदी, मराठी, प्रादेशिक सिनेमांचा आकडा आता ९७ वर गेलाय कोल्हापुरातून काहीतरी स्वप्नं बघून आलो होतो. कोणाचा संपर्क नव्हता. कितीतरी लोकांनी पैसे बुडवले. सुरुवातीचा काळ म्हणजे वनवासच होता. देवाला जिथं वनवास चुकला नाही तिथं आपण काय. पण कधी ’पाट्या टाकायचं’ काम केलं नाही.
‘ड्रीमर्स’ ने हा खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध केलाय आणि संधी सुद्धा. खरंतर मी या संधीचा वापर माझा ‘पीआर’ मेन्टेन करायला करू शकतो पण खूप दिवसांची मनातली चिडचिड शेअर करण्यासाठी या सारखा उत्तम प्लॅटफॉर्म नाही.
बऱ्याचदा निर्माते मला काम देतात आणि बाहेर अजून एक दोघांना पण डिझाईन करायला सांगतात. हा महाग आहे, तो स्वस्त आहे हे स्वतःच ठरवतात. माझ्याकडून बेसिक काम करून घ्यायचं आणि मग मला पैसे द्यायला लागतात म्हणून माझीच आयडिया दुसऱ्याकडून करून घ्यायची. मला पैसे तर देत नाहीतच पण क्रेडिट सुध्दा देत नाहीत. आणि त्यांना हवा असलेला १००% रिजल्ट पण मिळत नाही. काय साध्य झालं? मला काम मिळालं नाही याचं वाईट वाटत नाही पण ही प्रवृत्ती वाईट आहे. हेच लोक कधी तरी एखाद्या पार्टीत किंवा प्रीमियरला भेटले कि मग मान खाली घालून नजर चुकवतात.
दोनशे रुपयाला पण शर्ट येतो आणि दोन हजार रुपयाला पण येतो. दोन्ही तेच काम करतात पण क्वालिटीत फरक आहेच ना. मर्सीडीज आणि मारुती एकच काम करतात की. लोक स्वतःच्या लाईफ स्टाईल वर पैसे खर्च करतात पण करोडो रुपये घालून केलेल्या सिनेमाच्या प्रेझेंटेशन वर खर्च करताना मात्र त्यांना अनावश्यक वाटतो. हे निर्माते स्वस्त मिळतंय म्हणून कसंही काम करून घेतात मग लोकांनी त्याची दखल नाही घेतली की डोक्याला हात लावून बसतात. माझे आजोबा नेहमी म्हणायचे ‘ महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार!’ ..
कधी कधी एखादा दिग्दर्शक येतानाच चार पाच हॉलिवूड सिनेमांची पोस्टर रेफरन्सला घेऊन येऊन सांगतो की मला अशा टाईपचं पोस्टर हवंय. मी सांगतो की बाबा तुम्ही फिल्म ओरिजिनल बनवलीय तर तुम्हाला पोस्टर कॉपी कशाला हवंय? आपण बनवूया नं ओरिजिनल. बऱ्याच जणांना पटतं. काहींना तसंच हवं असतं. मग काय? त्यांना सांगतो की हे काम करण्यात माझ्या डोक्याला काहीच काम नाहीय सो तुम्ही दुसऱ्या कोणाकडून करून घ्या. आता असंही आहे की एखादी गोष्ट मी नाही केली तरी दुसरा कोणी तर ती करणारच आहे! मग आपणच का करू नये? डोक्याला त्रास न होता पैसे पण मिळतात… कारण हे आहे की त्याचीच लोकांना सवय लागते!!
आपल्या बहुतांश निर्माता दिग्दर्शकांना नवीन किंवा वेगळं काही करण्यात रिस्क वाटते. म्हणून त्याच त्याच स्टार्स ना त्याच त्याच प्रकारच्या रोल्स मधे कास्ट केले जाते. म्हणजे यांना त्यांच्या अभिनय क्षमतेवर सुद्धा शंका वाटते आणि प्रेक्षक वेगळ्या रूपात स्वीकारणार नाहीत याची खात्रीच. स्टार नाही घेतला तर सॅटेलाईट राईट्स नाही मिळणार.. थिएट्रिकल कलेक्शन नाही येणार…असली काय काय गणितं असतात. निर्माते येऊन सांगतात आम्हाला एक मल्याळम सिनेमाचा रिमेक बनवायचा आहे. आम्ही हे हे स्टारकास्ट ठरवलंय, हे हे टॉप चे टेक्निशियन घेतलेत त्यामुळे प्रोजेक्ट ब्लॉकबस्टर होणार. सगळ्यांना अशा मळलेल्या आणि सुरक्षित वाटेनेच जायचंय. ‘सैराट’ मधे कोण स्टार आहे? पण सिनेमा लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. सुपरहीट केला!! व्हेंटिलेटर आणि सैराट ही दोन अतिशय उत्तम उदाहरणं आहेत कास्टिंग बाबतची. ही रिस्क म्हणण्यापेक्षा कामावरचा विश्वास आहे आणि त्याला सपोर्ट करणारा निर्माता. लोकांना असं आवडतंय मग तसंच करा या मानसिकतेतूनच ‘प्रोजेक्ट’ होतात ‘सिनेमा’ नाही. जिथे फक्त गल्लाभरू विचार आहेत तिथे चांगली कलाकृती होणार नाही. सध्या सिनेमा कोण बनवत नाहीय सगळेजण प्रोजेक्टच बनवताहेत. प्रोजेक्ट म्हणजे फक्त फायद्याचा विचार असतो. प्रोजेक्ट चा अन आर्ट चा काही संबंध नसतो. फक्त पैसे मिळायला पाहिजेत! (बरं ते मिळतही नाहीत)
तांत्रिक काम करणाऱ्या लोकांची अवस्था तर रिवॉर्ड पण नाही अन अवॉर्ड पण नाही अशी आहे. निर्माते योग्य मानधन देत नाहीत आणि लोकांकडून ऍप्रिसिएशन पण मिळत नाही. सगळ्याच कलाकार तंत्रंज्ञांना वाटत असतं की एकवेळ पैसे नाही मिळाले तरी चालेल पण ऍप्रिसिएशन तरी मिळायला हवं. एखादी हिरोईन दहा हजाराचा ड्रेस घालणार नाही म्हणते तेव्हा हेच निर्माते लगेच तिला हवा तो पन्नास हजाराचा ड्रेस उपलब्ध करतात (‘स्क्रिप्ट ची डिमांड’ नसताना सुद्धा) पण आर्ट, कॉस्चुम, एडिटरसाठी मानधन देताना खालीवर करतात. योग्य मानधन नाहीच.. तेही वेळेत मिळत नाही.. रिस्पेक्ट मिळणं तर खूप लांबची गोष्ट! लोकांना कोणी काय केलंय यात रस नसतो, फक्त हिरो हिरोईन कोण आहेत यातच रस असतो. इथे सिनेमा बनवणाऱ्यांचा सुद्धा हाच दृष्टिकोन आहे हे वाईट आहे.
निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून फिल्म बनवता तेव्हा सगळ्या टीमला एकत्र घेऊन काम करायला पाहिजे. ‘बाहुबली’ सारखा सिनेमा टीमवर्कचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आर्ट, कॉस्च्युम असो किंवा कोणतंही डिपार्टमेंट असो नेहमी या कामांना दुय्यम मानलं जातं ही मानसिकता बदलायला पाहिजे. सिनेमाचं प्रत्येक डिपार्टमेंट समान महत्वाचं आहे. एखादं जरी कमी पडलं तरी अख्खी फिल्म फसते. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ चं मेकिंग बघितल्यावर लक्षात येतं की लगान फिल्म ग्रेट का आहे ते. त्यात प्रत्येक माणसाला समान स्पेस दिलीय. मला किती येतंय आणि तुला किती येतंय हा विषयच नसतो. तुम्ही जेव्हा एखाद्या डिपार्टमेंटचा हेड निवडता तेव्हा त्याचं काम बघूनच घेतलेलं असतं… मग द्या ना फ्रीडम त्याला. जेव्हा तुम्ही त्याच्या कामावर विश्वास टाकता, त्याला फ्रीडम देता तेव्हा उलट तो जास्त जबाबदारीनं काम करतो असा माझा अनुभव आहे.
सगळ्याच बाबतीत सिनेमाच्या तंत्र विभागाबाबत कशी अनास्था असते याचं एकदम ताजं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट पुरस्कारांमधे जाहिरात संकल्पनेसाठी सुद्धा एक पुरस्कार असायचा. मला ‘पांगिरा’ (वर्ष २०१०) साठी तो मिळालाय. आता हा पुरस्कार २ वर्षांपासून शासनाने द्यायचा बंद केलाय. याचं कारण असं समजलं की या विभागाचं परीक्षण करायला आमच्याकडे परीक्षक नाहीत. महाराष्ट्राला पुरोगामी लोकांचा, विचारवंतांचा, अशा अनेक बिरुदावल्या आहेत त्यात ‘कलावंतांचा महाराष्ट्र’ अशीही एक बिरुदावली आपण अभिमानानं मिरवतो! त्याच महाराष्ट्रात कलेच्या एका विभागाच्या परीक्षणासाठी परीक्षक!! यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. संजय कृष्णाजी पाटील यांच्याशी बोलणं झालं. ते यावर काहीतरी तोडगा निश्चित काढतील अशी अपेक्षा आहे.
नवीन मुलांनी पब्लिसिटी डिझाईनमधे यायला पाहिजे. स्पर्धा वाढली कि मजा येते. आर्ट कॉलेज मधून बाहेर पडलेली मुलं सहाय्यक म्हणून येतात. निर्मात्यांचा ऍप्रोच पाहून त्यांना या कामात रस राहत नाही. सगळेच निर्माते असे नसतात. मला बरेच चांगले निर्माते भेटलेत. चांगल्या कामासाठी बऱ्याच वेळा ‘लावून धरायला’ लागतं एवढंच. आता ज्यांना या क्षेत्रात यायचंय त्यांना फार मोठ्या संधी आहेत. आज सोशल मिडिया ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. तुम्ही पोस्टर करून तुमच्या वॉल वर पोस्ट करा. लोकं स्वतः ते शेअर करतात. आपोआप योग्य माणसापर्यंत पोचते. पण आत्ताची मानसिकता जरा चुकीची आहे, खूप घाई असते, लोकप्रियता व पैसे चटकन हवे आहेत. माझ्या करियर च्या सुरुवातीला इतका सोप्पा प्लॅटफॉर्म असता तर… असो!
सध्या मराठीत वर्षाला शंभर च्या वर सिनेमे बनतात. त्यातील पंधरा सिनेमे तुम्हाला माहिती होतात आणि फक्त तीन चार सिनेमे बॉक्स ऑफिस वर चालतात. बाकीचे सिनेमे कुठं जातात? या गायब सिनेमांचे निर्माते सिनेमा प्लॅन करताना पब्लिसिटी आणि मार्केटिंग च्या पैशाचा विचारच करत नाहीत. अख्खा सिनेमा बनवून झाल्यावर निर्माते जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांच्याकडे पैसे नसतात. सिनेमा बनवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच तो लोकांच्या पर्यंत पोहोचवणं सुद्धा महत्वाचं आहे ना? बजेट ठरवतानाच या विषयाला गांभीर्यानं घ्यायला हवं..
हिंदीत असे अनुभव आले नाहीत. हिंन्दीत मला भेटलेली माणसे प्रोफेशनल होती. मराठीत बऱ्याचदा प्रोफेशनॅलिझम जाणवत नाही. मग तुम्ही म्हणाल तू हिंदीतच का काम नाही करत. हिंदी पण करतोच. पण मराठी सिनेमा म्हणजे घरचं कार्य असल्यासारखं आहे! आपली भाषा..आपली माती! कोणीतरी हिंदी सिनेमाचं एखादं पोस्टर वाईट केलेलं असलं तर इतकं वाईट वाटत नाही पण मराठी सिनेमाचं वाईट काम पाहिलं की चिडचिड होते.
आपल्या मराठी सिनेमात बऱ्याचदा गोष्ट हीच ‘हिरो’ असते. ही अतिशयच चांगली गोष्ट आहे. आशय उत्तम असलेले बरेच सिनेमे आपल्याकडे बनतात. फक्त ते लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचणं गरजेचं आहे.. आशयाच्या दर्जाच्या बाबतीत आपण बंगाली, मल्याळम सिनेमाला कधीच मागे टाकलंय.
आपल्याकडे लोक सिनेमाचे दोन प्रकार समजतात एक अवॉर्ड विंनिंग सिनेमा आणि एक कमर्शिअल सिनेमा. (सिनेमा हा फक्त सिनेमा असतो त्यात आर्ट आणि कमर्शिअल असं काही नसतं असं ही काही लोक मुलाखतीत सांगत असतात) सिनेमा हा मुळात कमर्शिअल कला प्रकार आहे. तो मुळातच लोकांनी पहावा म्हणून बनवला जातो. मला अवॉर्ड विनिंग टाईप सिनेमांच्या पोस्टरचे काम करायला मजा येते. कामाचं समाधान मिळतं.. पण माझा वैयक्तिक पाठिंबा म्हणालात तर तो कायम कमर्शिअल सिनेमाला असतो. आर्ट फिल्म पण कमर्शिअल चालावी, लोकांपर्यंत पोचावी अशीच इच्छा असते. एन्ड ऑफ द डे निर्माता जगला पाहिजे. बाकी एसीत बसून इंटलेक्च्युअल गप्पा मारायला फार कर्तृत्व लागत नाही. एखादा निर्माता पब्लिसिटीसाठी आमच्याकडे येतो तेव्हा आमची इच्छा असते की याने घातलेले पैसे वसूल झालेच पाहिजेत. याचे पैसे वसूल झाले तरच हा पुढचा सिनेमा बनवणार. सिनेमे बनले, चांगले चालले तरच आम्हाला काम मिळणार ना? पहिलाच सिनेमा बनवून गायब होणाऱ्या निर्मात्यांची संख्या खूप आहे… या निर्मात्यांना आम्ही काही गोष्टी सांगत असतो ते त्या ऐकत नाहीत. कारण त्यांना सगळंच येत असतं. माहित असतं. ते ऐकूनही घ्यायला तयार नसतात.
मी एखाद्या सिनेमाचा भाग आहे तर माझं पण काहीतरी म्हणणं आहे ते फक्त ऐकून घ्या. (असं प्रत्येक डिपार्टमेंट च्या लोकांच म्हणणं आहे!) इम्प्लिमेंट करायचं कि नाही हा तुमचा भाग आहे. मी केलेल्या पोस्टर मधून योग्य संदेश दिला गेला.. सिनेमा नीट प्रेझेन्ट झाला तर उपयोग आहे ना. सिनेमाचा मूड योग्य कम्युनिकेट झाला पाहिजे एवढाच हट्ट असतो. बाकी काही नाही. माझे पैसे मला मिळणारच आहेत सिनेमा चालला काय नाही काय.. मला काय फरक पडतो? निर्मात्याला समजावत बसून वेळ कशाला घालवायचा? करूया न गुडी गुडी… तूच हुशार बाबा! हे मला पटत नाही. तुम्हाला (निर्माता किंवा दिग्दर्शक) काय वाटतंय ते माझ्यासाठी महत्वाचं नसतं ऑडियन्सला काय वाटतंय ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. तो आकर्षित झाला पाहिजे. तो थीएटरमधे आला पाहिजे.
इथे निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला पोस्टरच्या कन्सेप्ट पेक्षा त्यांचा लोगो किंवा नावाचा फॉन्ट किती मोठा आहे यातच जास्त रस असतो. तुम्ही सिनेमा चांगला केलात की तुमचं नाव आपोआप मोठं होणारच की. सिनेमासोबत काम करणारी लोकं आपोआप मोठी होतात. ‘बाहुबली’ जेव्हा सुपरहिट झाला तेव्हा राजामौलीचं नाव लपून राहिलं काय? अगदी छोट्याछोट्या दृष्यासाठी काम केलेल्या कलाकारांची नावं लोकांनी शोधून काढलीत.
सगळ्यांना सगळं येण्याच्या आणि चाटूगिरी करून पुढं जायच्या या काळात चांगलं काम करणारी माणसं डिस्टर्ब होणं साहजिकच आहे. पेशन्स! माझा अत्यंत आवडता शब्द आहे. तो असल्याशिवाय काहीच होत नाही. जादूने काहीच घडत नाही. प्रामाणिकपणे काम करत राहायचं एवढंच माझं ब्रीद आहे… त्याचं चांगलं फळ मिळणारच एक दिवस! शेवटी चांगलं काम लपून राहत नाही. पेशन्स!
चला खूप वेळ घेतला. मी आतापर्यंत ज्या ज्या निर्माता दिग्दर्शकांसाठी काम केलंय त्यांचा खूप आभारी आहे त्यांच्यामुळेच काम करू शकलो.
जय महाराष्ट्र! जय सिनेमा!
सचिन सुरेश गुरव
(पब्लिसिटी डिझायनर)
अतिशय योग्य पद्धतीने सध्याच्या परिस्थीचे वर्णन केले आहेस तू दादा. लोकांना काय हवं ते तुला चांगलं कळतंय पण निर्मात्यांना हि कळलं पाहिजे. Quality महत्वाची Quantity काय करायची. तुझं कामचं बोलत आणि ते असंच चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत येत राहावं हीच सदिच्छा.
मित्रा तुझं तुझ्या कामावरचं प्रेम आणि आत्मीयता लक्षात येते.... एकंदर आपण केलेल्या कामाचं कौतुक हे पाठीवर दिलेली थापही खुपकाही करून जाते... कलाकार भुकेला असतो तो जाणकाराची दाद मिळवण्यासाठी एखादी गोष्ट कमी खर्चात मिळवण्यासाठी पर्याय शोधणे व नंतर कपाळावर हात मारणे हे तर सुत्रच झाले आहे. पण तीच गोष्ट योग्य पात्र व्यक्तीकडून केल्यावर वाचणारा वेळ आणि मिळणारी क्वालिटी हे लोक समजून घेत नाहीत... त्यावेळी दगडावर डोकं मारून घेतल्यासारखं होत पण त्रास आपल्यालाच पब तुझं कामप्रती आणि प्रत्यक्ष त्या प्रोजेक्टप्रती प्रेम आणि आपुलकी पाहता हरेक निर्मात्याला त्यांची चूक कळूनच येईलच तुझे काम नितांत चालू ठेव, खचू नको ....
सचिन सुरेश गुरव यांनी अतिशय पोटतिडकीने लिहलंय हे.. हल्ली व्हाॅटस् अप आणि मेल प्रत्येकाच्या मोबाईलवर आल्याने हे फारच बोकाळलंय.. प्रत्येकालाच आपल्याला प्रत्येक फील्डमधलंं कळतंय असं वाटतं, खरं तर ज्या प्रामाणिक माणसावर जबाबदारी सोपवलीय, त्याला त्याच्या मनाप्रमाणे काम करायला दिलं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. सचिन प्रमाणेच मीही गेली पंचवीस वर्षे नाटकाच्या क्षेत्रात वृत्तपत्रांतील जाहिरातींची कामं करतो आहे, मला राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारही मिळालेलेि आहेत, पण सध्या सर्वत्र सचिननी लिहिल्यासारखीच परिस्थिती दिसते आहे.. सचिन, उत्कृष्ट ब्लॉग साठी हार्दिक अभिनंदन..
Ya la karnibhut aapli system pan aahe(ek khadya cinema la theaters milat nhi pan hindi la availble astat & awards bund zale ekhadhya departmentche).
Hi Sachin , Very true , in very perfect words you mentioned reality .
Hi how r u
संपूर्ण लेख वाचला, अत्यंत मुद्देसूद लिहीले आहे, एकंदर चित्रपटसृष्टितील मानसिकता उघड केली. मलादेखील थोडाबहूत असाच अनूभव आला आहे.
काही लोकांचा चेहरा खुप काही बोलून जातो, मनातली ही खलबतं आणि व्यक्त होण आयुष्याच्या गणिताचा एक प्रमेयच आहे, मला मात्र हा 'पेशन्स' आणि "मिशी खालचं काळीज" उलघडल :)
Superbly written Sachin...
(दोन महिन्यात फोटोशॉप शिकून शेकडो मुलं मार्केट मधे स्वतःला कलाकार (आर्टिस्ट) समजून येत आहेत) हे खरंच आहे- कलाकार कलाकाराला समजून घेवु शकतो पण नुसताचं कलाकार काहीच समजू शकत नाही
मला खूप आनंद होतो की आपल्या गावचे सचिन दादा खपू ग्रेट आहेत चित्रपट हा तर पोस्टार एडिटिंग त्याची quality ठरतो
सचिन दादा , चित्रपट हा तर पोस्टार एडिटिंग च्या quality ठरतो तर खुप सुंदर तुमचं काम
Sachin da all is well sagal thik hoil tu jitke poster kelet mi sagle baghitle khup chan aflatun kaam ahe tuz.
एकाच लेखात या विषयाच्या वेगवेगळ्यांना पैलूंना स्पर्श केला असून अगदी मनापासून, आतून प्रत्येक शब्द आला आहे. ओघवत्या शैलीमुळे आपण मनोगत जणू काही प्रत्यक्ष ऐकतो आहेत असा भास होतो. मला अस वाटत कि चित्रपट हे दिग्दर्शकाच माध्यम आहे. एखादी संहिता, कथानक आवडल्यानंतर त्यातून प्रेक्षकांना नेमक काय सांगायच आहे हे त्याच्या मनात नक्की असते. त्यानुसार तो पटकथा व संवाद यांना त्यानुसार आकार देववून घेत असतो. दिग्दर्शकाला आपल्याकडून काय हव आहे याच टीममधल्या प्रत्येकाला नेमक आकलन झाल कि दिग्दर्शकाच निम्म काम संपत. संपूर्ण टिम व या टीममधील प्रत्येक सदस्य मग प्रीप्राॅडक्शन पासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत दिवसरात्र मेहनत घेत असतो. त्यामुळेच चित्रपट हा पडद्यावरील व पडद्यामागीलही प्रत्येक कलाकाराची कलाकृती असते किंबहुना या प्रत्येकाच्या मनात "हा माझा पिक्चर" अशी भावना असते. लेख सुंदर आहे ! ( श्री विवेक जाधव यांनी शेयर केला ) अभिनंदन व धन्यवाद !!
Hello...sachin, Excellent Artical....nice information...for all Artist and Audience.
अतिशय सुंदर अाणि अप्रतिम लेख