श्रद्धा आणि सबुरी
मराठी चित्रपटांवर लिहिण्या इतका अधिकार नसतानाही हे धाडस करतोय. गेले 15 वर्ष ह्या व्यवसायात जे अनुभव गाठीशी आलेत त्यातून मांडलेला हा विचार आहे. कुठल्याही कलाकारांमध्ये असलेला अस्वस्थपणा, म्हणूनच स्वस्थ होण्यासाठी चाललेला प्रयत्न आणि त्यातून पुन्हा येणारी अस्वस्थता; हीच खरं तर आमची भूमिका.
आज पर्यंत अनेक वेगवेगळे चित्रपट केल्यावर, अनेक भूमिका केल्यावर, पुढचं पाऊल टाकण्या आधी एक थांबा आवश्यक असतो. जिथून आपण आलेली आणि जिथे जायचंय ती वाट पाहू शकतो. आलेल्या वाटेवरचे अनुभव तर असतातच, चुकांची जाणीव ही असते आणि नव्या वाटेचा उत्साह ही असतो. अशा वेळी अतिशय तटस्थ वृत्तीने आपण आपलं परीक्षण केला पाहिजे.
आज 100 वर्ष मराठी चित्रपटाला पूर्ण झाली. अनेक प्रवाह ह्या 100 वर्षात सिनेमांनी अनुभवले. मधल्या काळात अत्यंत निराशाजनक प्रवासही अनुभवाला, पण गेल्या काही वर्षात पुन्हा ह्या प्रवाहांनी वेग पकडला. पण हे संक्रमण प्रत्येक क्षेत्रात येत असतं. ते आवश्यकही असतं.
सर्वात आधी मला वाटतं कि आम्ही एका अत्यंत गरज नसलेल्या क्षेत्रात काम करत आहोत. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या पैकी कुठल्याही सदरात आम्ही मोडत नाही. ह्या तीन गरजा पूर्ण झाल्यावर आमची आवश्यकता आहे का हे लोकांच्या इच्छेवर अवलंबून असतं. त्यांची आवड, त्यांची संवेदना, त्यांचा उत्साह अशा अनेक गोष्टींवर आमचं भवितव्य ठरत असतं.
चित्रपटाची कुठलीही भाषा नसली हे खरं जरी असलं तरी अनेक भाषेतल्या चित्रपटांबरोबर स्पर्धा ही होतच असते. आणि अशी जर गळेकापू स्पर्धा आजूबाजूला आहे तर त्यात आमचं वेगळेपण टिकवण्याचा प्रयत्नही व्हायला पाहिजे. आणि ते वेगळेपण जपण्यासाठी आधी आम्हाला आमची ताकद कळली पाहिजे. जमिनीत तेच बी उगवतं ज्याला जन्म द्यायचे गुण त्या जमिनीत असतात. मारून मुटकून लावलेलं झाड त्या जमिनीत ढासळूनच जाणार. आमच्याच जमिनीचे गुणधर्म शोधण्याची आवश्यकता आम्हाला आता जास्त आहे.
जेवताना सुद्धा आपण एक घास संपला कि दुसरा घेतो. आधीचं पचायला थोडा वेळ देतो. पण आम्हाला आत्ता इतकी घाई झालीय कि सर्व जेवण एका घासात संपवायचंय. मग अपचनाचा त्रास आलाच. तोच सध्या आमच्या चित्रपटांना झालाय. नाटक आहे, इतर कार्यक्रम आहेत, झालच तर घरबसल्या फुकटात मनोरंजन करणारा एक मोठा माध्यम आहे, हातात मोबाईल आहे (ज्यावर कौतुकाने दुसऱ्या दिवशी कसा पिक्चर माझ्या मोबाईल वर आला हे सांगणारी अत्यंत अभिमानी माणसं आहेत) आणि ह्या सगळ्यानंतर उरलेला ऑपशन म्हणजे थिएटरला जाऊन सिनेमा बघणं आहे आणि तो ही मराठी.
मग खरोखर जर लोकांनी चित्रपटाला यावं असं वाटत असेल तर तो चित्रपट कसा असायला हवं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही.
ज्यांच्या समोर चित्रपट न्यायचाय ते अत्यंत हुशार आहेत, जागतिक चित्रपट पाहणारे आहेत. तुमच्या उडवलेल्या एका अँबॅसिडरपेक्षा बॉन्डनी उडवलेल्या विमानाची भव्यता त्यांच्या नजरेत आहे. तुमच्या सरदारामागे धावणाऱ्या 3 घोडेस्वारांपेक्षा 300 किंवा ट्रॉय मध्ये दाखवलेल्या अगणित सैन्यांनी त्यांच्या मेंदूचा कब्जा कधीच घेतलाय. मग आता तुमच्याकडे राहिलं काय?
आम्हाला कुठल्या वाटेनी जायचंय ह्याचा धडा आमच्या पूर्वजांनी आधीच घालून दिलाय. आणि त्या वाटेवर चालणारे अनेक मित्र आजूबाजूला आहेत त्यात कोणी दिग्दर्शक, कोणी लेखक, कोणी निर्मातेही आहेत. त्यांच्या कामाचं कौतुक व्हायलाच पाहिजे. ह्या नव्या दमाच्या मेकर्समुळे आज अत्यंत विलक्षण विषयांचा आनंद आपण चित्रपटातून घेत आलोय.
अशा वेगळ्या वाटा शोधणाऱ्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. अमुक चित्रपट चालला म्हणून तमुक चालत नाही. हाताची सगळी बोटं सुद्धा सारखी नसतात मग एकसारख्या विषयावर चित्रपट बनवण्याचा अट्टाहास कशाला? आपण निवडलेल्या विषयावरची श्रद्धा आणि तो पुरा करण्यासाठी लागणारी सबुरी जो पर्यंत येत नाही तो पर्यंत हा प्रवास अडखळतच चालणार.
1000 वर्षांपूर्वीची अजिंठा वेरूळ लेणी पाहताना अचंबित व्हायला होतो, ज्यांनी ती घडवली त्यांच्या विषयी अपार कौतुक डोळ्यात दाटून येत. चित्रपट ही एक प्रकारचं लेणं आहे. आपल्यानंतरही टिकून राहणारं, कितीही वेळा त्याच उत्कटतेतून भेट द्यावी असं लेणं. हे लेणं घडवण्याची आणि सांभाळण्याची ताकद आमच्या अंगी यावी हीच प्रार्थना.
आणि जाता जाता महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळालच पाहिजे (आणि हा चर्चेचा विषयच नाही).
मराठी चित्रपट चिरायू होवो…
-Written by Actor Director Subodh Bhave.
[pssc_all] Shares