माझी दुहेरी भूमिका
मी अगदी लहानपणी म्हणजे दिड वर्षाची असताना पहिला सूर लावला. घरात अखंड गाणं आणि तसंच वातावरण असल्यामुळे मी कधी गायला लागले हे माझं मलाच कळलं नाही. प्रत्येकालाच जसा लहानपणी प्रश्न पडतो की मला मोठं होऊन ‘काय व्हायचंय’? तसा मला कधीच पडला नाही. मला माहीतच होतं की आयुष्यात मला फक्त गाणं आणि गाणंच करायचंय आणि अजूनही तसंच आहे.
या सगळ्यात मी कधी अभिनय करू शकेन असा साधा विचारही माझ्या मनात कधी आला नव्हता. पण माझे आजोबा नाटक Direct करायचे, अभिनय तर उत्तमच करायचे म्हणून कदाचित मला वाटतं की ते माझ्याकडे वारसाने आलं असावं. पण ही गोष्ट मला पहिल्यांदा कळली ती पंतांमुळे (प्रभाकर पणशीकर). माझं गाणं ऐकून पंतांनी मला त्यांच्या ”संगीत अवघा रंग एकची झाला” या संगीत नाटकात प्रमुख भूमिकेसाठी विचारलं. रघुनंदन पणशीकरांचं संगीत या नाटकाला होतं. त्यांच्याकडे या निमित्ताने शिकायला मिळेल या इच्छेमुळे मी ते नाटक स्वीकारलं. एकंदरीत मी त्या नाटकाचे ७५ प्रयोग केले. अभिनयाचं पहिलं बाळकडू मला पंतांकडून मिळालं. मोठे मोठे कलाकार जे म्हणतात की ‘Theatre केल्याशिवाय खरा अभिनेता घडत नाही’. त्याचा अक्षरशः प्रत्यय मला आला. मी जो काही थोडाफार अभिनय करू शकले तो या नाटकाच्या अनुभवातून.
माझं त्या नाटकातलं काम पाहून मला सुजय डाहाकेनं ‘शाळा’तल्या ‘शिरोडकरच्या’ भूमिकेसाठी विचारलं. मला शाळा ही कादंबरी खूपच आवडली होती त्यामुळे मी लगेच होकार त्यांना सांगितला. ‘शाळा’तल्या ‘शिरोडकरवर लोकांनी भरभरून प्रेम केलं. तो सिनेमा खूप गाजला आणि खऱ्या अर्थाने स्टारडम काय असतं याची जाणीव शाळाने तेव्हा मला करून दिली. कारण त्यानंतर मी जेव्हा कुठेही बाहेर जायचे तेव्हा मला ‘गायिके’ बरोबरच ‘शिरोडकर’ म्हणूनही ओळखू लागले. याच दरम्यान मी ‘आरोही’ हा चित्रपट केला, ज्यात त्यांना गायिका/अभिनेत्री अशीच मुलगी अपेक्षित होती. ह्या चित्रपटातील ‘रंगुनी रंगात माझ्या’ या गाण्यासाठी मला Mirchi Music अवॉर्ड मिळालं. शाळा या चित्रपटासाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळालं तसेच राज्यशासनाचा सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार मिळाला. त्यानंतर मलाच माझी गायिका-अभिनेत्री ही ओळख पक्की झाली. खूप मोठ मोठ्या दिग्गजांनी माझं असं कौतुकही केलं की ”जुन्या काळातल्या गायिकाच अभिनयही करायच्या, तो काळ तू पुन्हा जिवंत केलास.”
त्याच वेळेला मला महेश मांजरेकरांनी ‘शाळा’तल्या शिरोडकरचं काम पाहून ‘काकस्पर्श’ करीता ‘उमा’ च्या भूमिकेसाठी विचारलं. माझ्यासाठी ही भूमिका अत्यंत चॅलेंजिंग होती. महेशजींसारख्या अनुभवी आणि कसलेल्या डायरेक्टर कडून मला खूप काही शिकायला मिळालं. महेशजींचा हा खूप मोठा गुण आहे की ते त्यांच्या Actorला Space देतात! खुलू देतात! जे माझ्याही बाबतीत घडलं आणि म्हणूनच ते माझे आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. शाळा प्रमाणेच काकस्पर्शतल्या उमानेही मला खूप काही दिलं. अनेक जाणकार रसिकांकडून शाबासकीची थाप मिळाली. या चित्रपटामुळे मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आंतरराष्ट्रीय MICTA पुरस्कार मिळाला. काकस्पर्श मधल्या टक्कल केलेल्या सीन साठी आजही माझी वाहवा होते.
यानंतर मी अजय ठाकूर यांनी सायकल रिक्षावाल्याचा गरीब माणसाच्या मुलीच्या शिक्षणासाठी संघर्ष असलेल्या ‘तानी’ या चित्रपटासाठी मला विचारलं. हा चित्रपट बनवण्याच्या मागे त्यांचा कुठलाही commercial उद्देश नव्हता. या चित्रपटाने मला माझ्या आयुष्यातला आणखीन एका ध्येयाची जाणीव करून दिली. तुम्ही एखादा larger than life रोल करता तेव्हा तुम्ही त्यात फक्त रोल पुरते असू शकत नाही. तर लोक तुम्हाला त्यांचे रोलमॉडेल म्हणून बघत असतात आणि त्यामुळे त्यांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा देखील वाढतात. हे मला या ‘तानी’च्या लोकप्रियतेमुळे कळलं. आज मी नवीन वर्षात, ‘केतकी फाऊंडेशनची’ स्थापना करते आहे. या फाऊंडेशनचे कामच मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणं हे असणार आहे, याची प्रेरणा मला ‘तानी’मुळे मिळाली.
यानंतर एक टाईमपास नावाचं वादळ आलं. त्याला वादळ मी यासाठी म्हणेन कारण बॉक्सऑफिस वरचे त्यावेळेचे सर्व रेकॉर्ड्स या फिल्मने मोडले. यातल्या प्राजूच्या भूमिकेवर लोकांनी अलोट प्रेम केलं. या निमित्ताने रवी जाधव सारख्या ग्रेट डिरेक्टर कडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. रवीजींनी मला या चित्रपटात मला वेड लागले प्रेमाचे हे गाणंही गायला लावलं ज्या गाण्यासाठी मला Filmfare, महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार मिळाले.
टाईमपास नंतर महेशजींनी मला ‘काकस्पर्श’ हिंदी आणि तामिळ साठी विचारलं. आपल्याला हिंदी तामिळ जमेल कि नाही अशी शंका मनात होतीच पण महेशजींनी खूप सोप्या पद्धतींनी या ही गोष्टी तडीला नेल्या. या दोन्ही चित्रपटांना संगीतातील सर्वात महान संगीतकार इलयाराजा सर यांनी संगीत दिलं होतं. महेशजींनी यात माझ्याकडून ४ गाणी दोन्ही चित्रपटात गाऊन घेतली. खूप मोठा विश्वास त्यावेळी माझ्यावर दाखवला. आणि या अप्रतिम संधीबद्दल मी त्यांची आजन्म ऋणी राहीन. इलयाराजा सरांनाही मी यात गायलेली अंगाई खूप आवडली. आणि त्यांनी माझ्याकडून तामीळमध्येही ती गाऊन घेतली.
यानंतर टाईमपास – २ चं शूटिंग झालं. त्यात माझा रोल खूप जास्त नव्हता पण छोटा असला तरी इंटरेस्टिंग होता शिवाय रवी सरांनी ‘सुन्या सुन्या’ हे खूप सुंदर गीत माझ्याकडून गाऊन घेतलं. हा चित्रपटही खूप गाजला.
टाईमपास २ नंतर मी बऱ्याच दिवसांनी ‘फुंतरू’ चित्रपट केला. अजय ठाकूर आणि सुप्रसिद्ध इरॉस इंटरनॅशनलच्या ह्या फिल्ममध्ये माझा डबल रोल होता. फुंतरू आणि अनया अशा दोन सक्षम आणि एकदम वेगळ्याच भूमिका होत्या. या निमित्ताने पुन्हा एकदा मला सुजय दादाच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळाले. त्याचे चित्रपट हे पठडीतल्या चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळे दिसतात हे मात्र नक्की. फुंतरू चित्रपटात फुंतरूचं कॅरॅक्टर हे अत्यंत ग्लॅमरस आणि खूप वेगवेगळ्या लूक्स मध्ये दाखवलंय! त्यामुळे मला स्वतःला खूप वेगवेगळ्या रूपांमध्ये एक्सप्लोर करायला मिळालं. या चित्रपटाचे मेकअप आर्टिस्ट विनोद सरोदे यांच्याकडून मेकअप करायला मी शिकले ‘फुंतरू’ मध्येही मी एक गाणं गायलं आहे.
तर अशा पद्धतीने सुरुवातीपासूनच माझी ‘गायिका’ + ‘अभिनेत्री’ ही प्रतिमा जपत मी पुढे जायचा प्रयत्न करते आहे. मराठी इंडस्ट्रीने मला खूप मित्र मैत्रिणी दिले आहेत. इथे वावरताना खूप शिकायला मिळालं. खूप दिग्गज कलाकारांकडून दाद आणि कानपिचक्याही मिळाल्या आहेत. आज हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो की साहित्यातल्या अजरामर कलाकृती आपल्या इंडस्ट्रीने पडद्यावर आणल्या. अनेक चित्रपटांतून प्रखर जनजागृतीही केली आहे. संवेदनशील अशा विषयांना हात घालत लोकांच्या सामाजिक जाणीवही जिवंत केल्या आहेत. अत्यंत आशयघन असे चित्रपट आणि उत्तम दर्जा असलेले मनोरंजनात्मक विनोदी चित्रपटही आपण दिले आहेत, देतो आहोत.
दादा साहेब फाळकेंसारख्या एका मराठी माणसाने निर्माण केलेल्या या इंडस्ट्रीचा मी एक लहानसा हिस्सा आहे याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो. आज हिंदी चित्रपटसृष्टीतही आशय असलेल्या कथांसाठी आपल्या मराठी इंडस्ट्रीकडे आशेने पाहिलं जातं ही केवढी सन्मानाची गोष्ट आहे! अशा लाखो लोकांना, कलाकारांना, तंत्रज्ञाना सामावून घेणाऱ्या आणि रोजीरोटी देणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीला माझा मानाचा मुजरा….!!!
-Written by – Ketaki Mategaonkar (Actress, Singer)
[pssc_all] Shares