फ्रॉम नॅरो गेज टु ब्रॉड गेज
तो खरा ‘हिरो’…. कॅमेरा विषयी बोलतोय मी ! .. आयुष्याला negative पासून positive बनवणारा ‘कॅमेरा ‘ …. एक असं यंत्र जे तुम्हाला जग वेगळ्या पद्धतीने ‘बघायला’ शिकवतं, दोन डोळे उघडे ठेऊन काही वेळेला न दिसणाऱ्या गोष्टी एक डोळा किलकिला केल्यावर दाखवणारा सारथी . एक असं माध्यम जे त्याच्या मागील आणि समोरील , आजूबाजूच्या सर्वांना आनंद देतं. आबालवृद्धांना ह्याच्यापुढे चांगलं दिसायचं असतं आणि बरंच काही..
शूटच्या ब्रेकमध्ये जेव्हा तो कॅमेरा ट्रायपॉडवर एकटा असतो, तेव्हा काही वेळेला माझा नॅरो गेज प्रवास काही क्षणातच डोळ्यासमोरून तरळून जातो. बोटं दुर्बिणीसारखी करून तयार झालेला कॅमेरा,शाळेत असताना केलेला कागदी कॅमेरा,मधूनच केव्हातरी फॅमिलीमधील कोणाचातरी एका फोटोपुरता मिळालेला कॅमेरा … आधीपासूनच बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या रूपात भेटत राहिला, पण हा कॅमेरा आयुष्याचा इतका जवळचा साथीदार होईल असं कधीच वाटलं नव्हतं..
फोटोग्राफी – फोटो म्हणजे लाईट आणि ग्राफी म्हणजे लिहिणे , लाईट च्या साहाय्याने लिहिणे म्हणजे फोटोग्राफी , एका मुलाखतीत ऐकलेले सरांचे हे वाक्य.. खूप काही शिकवून गेलंय . माझा फोटोक्लिकर ते फोटोग्राफर हा प्रवास सुरु करून देणारे माझे गुरु स्व. श्री. गौतम राजाध्यक्ष ह्यांना जाऊन सुद्धा ६ वर्षे होतील , पण ‘त्यांनी’ चालू करवून दिलेला हा नॅरो गेज ते ब्रॉड गेज प्रवास तसाच चालू आहे.. ..
२०११ साली सर गेले आणि एक भयंकर पोकळी निर्माण झाली,, कारण प्रत्येक फोटो हा मी त्यांना दाखवण्यासाठी काढत होतो, त्याच्या वर discussion करत होतो.त्यामुळे त्यांचा फोन, gmail चॅट्स , प्रत्यक्ष भेटी हे सर्व आणि सर्वात महत्वाची त्यांची येणारी शाबासकीची थाप, त्यांचा सहवास ह्या सर्व आठवणी खायला उठल्या होत्या .. पुढचा प्रवास त्यांच्या शिवाय ? ते गेले तेव्हा मी खरंच फोटोग्राफी सोडण्याच्या विचारात होतो; पण मग विचार आला की नाही, ‘त्यांनी’ ज्या रुळांवर प्रवास करायला सांगितला आहे तो करायचा. त्यांच्याबद्दलच्या सर्व भावना मी ” माझे सर गौतम राजाध्यक्ष ” ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
हां , तर माझा कॅमेरा बरोबरचा प्रवास काहीसा असा चालू झाला ….
ट्रेकिंग करताना जरा बरे फोटो काढता यावेत म्हणून घेतलेला कॅमेरा , तो मला थेट सरगौतम सरांकडे घेऊन गेला, , त्याचं झालं असं कि डिग्री कॉलेज नंतर ऍनिमेशन ला ऍडमिशन घेतली, ती इन्टिट्यूट दिव्यं आणि तिकडे शिकवणारे महादिव्य.. महादिव्य अश्यासाठी कारण माझ्या आधीच्या बॅचचा सुमार स्टुडंट हा माझा सर होता आणि स्वतः अनेक दशके शिक्षक असल्याचा आव आणीत होता.. थोडक्यात, मला माझं भविष्य त्याच्या इतकंच सुमार वाटू लागले होते. त्याच्या हाती आपले भविष्य देऊन प्रयोग करण्यापेक्षा मीच माझ्या वर्तमानावर का प्रयोग करू नये असा विचार मनात येऊन गेला …. आणि खूप दिवस बॅग मध्ये बंद असल्येल्या कॅमेऱ्याकडे लक्ष गेलं. ह्याच्या काही महिने आधी मी हिमाचल मध्ये ट्रेकिंग ला गेलो होतो. मला शूटिंगची आवड होती म्हणून आईने मला एक लहानसा handycam घेऊन दिलेला होता, परंतु त्यावर इतके चांगले STILL फोटो येत नसत. बाकी खूप जणांकडे डिजिटल कॅमेरे , DSLR कॅमेरे होते आणि त्यात खूप मस्त क्लॅरिटी येत होती , म्हणून ट्रेकनंतर आईकडे थोडासा ‘ बालहट्ट ‘ करून एक कॅमेरा घेतला ( ते वय कॉलेजचे असल्यामुळे माझी अर्थमंत्री आई होती 😉 ), कॅमेरा तर घेतला खरा पण वापरायचा कसा हे आज सारखंच तेव्हा सुद्धा माहिती नव्हतं 😉 म्हणून एका बेसिक कोर्स ला ऍडमिशन घेतली. १२ दिवसाच्या ह्या बेसिक कोर्समध्ये कॅमेऱ्याने खूप उत्सुकता निर्माण केली.. पण अनिमेशन मुळे त्या कडे फार लक्ष देता आले नव्हते.. ..
ह्या सर्व गोतावळ्यात एक विचार मनाशी पक्का होता कि करिअर कुठलही असो , आपल्या आईला जितका आर्थिक हातभार लावता येईल तितका प्रयत्न करायचा. माझ्या वडिलांच्या देवाज्ञेनंतर आई हीच माझी आई आणि वडील होती. करिअर म्हणून आपली आवड जोपासताना ज्यातून काही प्रमाणात पैसे मिळतील आणि CREATIVITY सुद्धा जोपासता येईल अश्या करिअरच्या शोधात असताना हा कॅमेरा ‘क्लिक ‘ झाला. ह्याच दरम्यान सरावासाठी काढलेले काही फोटो मी एका सोशल नेटवर्किंग साईट वर टाकले होते , ते गौतम सरांनी बघितले आणि मला बोलावून घेतले .. “तुझ्या नेट वरील फोटोमधील धडपड मी वाचू शकलो; खरंच फोटोग्राफी शिकायची आहे का ? आवड असेल तर मी तुला नक्की शिकवीन ” हे गौतम सरांचं वाक्य ऐकलं आणि तिथूनच फोटोक्लिअर ते फोटो ग्राफर हा प्रवास चालू झाला , पण हा प्रवास अनुभवायला, मला टोकायला , टपली मारायला माझे सर हयात नाहीत, अदृश्य रूपाने असतील.. नक्कीच . माझे वडील स्व.पं. दीपक नेरुरकर उत्तम तबलावादक होते, ते नेहमी म्हणत कि मला माझ्या गुरूंनी तबला दिला पण त्याहून महत्वाची अशी ‘नजर’ दिली. तेव्हा अर्थ समजला नाही, पण आता हळू हळू उमगतोय. कदाचित गौतम सरांकडे मी काहीच वर्षे शिकलो असीन पण सर्वात सुंदर अशी नजर मात्र तो अवलिया देऊन गेला. अजून फोटोग्राफर होण्यासाठी खूप वेळ आहे पण ह्या प्रवासामधील ‘CLICKS’ मी खूप enjoy करतोय .
सुरुवातीच्या काळात, सुमारे २००८ साली कॅमेरा घेतला , बेसिक कोर्स केला, गौतम सर भेटले, हो … पण ते जे शिकवत असत त्याचे प्रॅक्टिकल कोणावर करू? मला असे लोक हवे होते जे मला कंटाळणार नाहीत आणि मला माझी प्रॅक्टिस करायला देतील… मग ‘ फॅमिली मेम्बर्स ‘ चे फोटो काढायला सुरुवात केली , पण ‘घर की मुर्गी दाल बराबर ‘ – इतके मी फुकट फोटो काढून देतोय तरी कोणाला नको ? आश्चर्य नाही का ? नाही. कारण सुद्धा तसंच होतं म्हणा. तोपर्यंत मी गौतम सरांकडे शिकायला जात नव्हतो , म्हणून नेट वर फोटोग्राफर्स चे ब्लॉग वाचून , चांगल्या फोटोग्राफर्स चे फोटो बघून बघून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचो , रात्रभर जागून हे लाईट वर काम करायचो आणि सकाळ सकाळ घरातील मंडळींची झोप मोड करून त्यांना कॅमेऱ्या समोर उभे राहा असा सांगायचो .. असे माझे पांचट प्रयत्न सपशेल फोल ठरले.. आणि मी मोर्चा माझ्या शाळेतील मैत्रिणींकडे वळवला ….
मार्केटिंग चे लोक कसे फोन करून गोड बोलतात ना ? अगदी तेवढं नाही पण जवळ जवळ तसेच फोन मी माझ्या वर्ग मैत्रिणींना केले आणि त्यांचे फोटो काढू लागलो. लाईट कसा ठेवावा, सॉफ्टनेस कसा हाताळावा इत्यादी डोक्यावरून जाणाऱ्या गोष्टी उगाचच ‘try ‘ करायचो पण त्यात प्रामाणिकपणा होता, इतके नक्कीच होते की आपल्या फोटोमुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसले पाहिजे,.. मग कॉलेज मधील मैत्रिणींचे फोटो काढायचा प्रयत्न केला ,… त्यात काही फोटो बरे आले, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे , आताची माझी सर्वात मोठी ‘क्रिटिक’ , माझी बायको सौ. गौरी अशाच प्रॅक्टिस सेशन्समध्ये कॅमेऱ्या समोरून माझ्या पाठीशी केव्हा येऊन उभी राहिली ते कळलंच नाही . 🙂
मग माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींचे सुद्धा फोटो काढले ,, वैष्णवी कानविंदेच्या रेफरन्सने महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली .. माझ्या मते ती माझ्या आयुष्यातली फोटोग्राफी साठी ची खूप महत्वाची संधी आहे. .. मी अगदी नवखा होतो पण संपादक पानवलकर सर , प्रवीण मुळे सर आणि संपुर्ण म टा टीम ने विश्वास ठेऊन काही फोटो काढायला सांगितले.त्यांना ते आवडले, आणि आज ७ वर्षे मी त्यांच्या साठी फोटोशूट्स करतो आहे .. आता वेळे अभावी त्यांच्यासाठी खूप फोटो काढता येत नाहीत पण त्यांनी सुरुवातीला मला खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला. ती मदत मी कधीही विसरू शकत नाही .. मुद्दा हा आहे की त्यावेळेला वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.
१)आपण काढलेले फोटो हे वाचकांच्या दृष्टीने कसे असू शकतील ?
२ ) किती कमी वेळात एखाद्या विषयावर विचार करून फोटो काढायला मिळेल ?
३ ) कुठला उत्सव किंवा सण आहे त्याची कलरस्कीम काय, त्या ‘palette’ मधील फोटो.
४ ) कुठला अँगल चांगला वर्क करू शकतो ?
५ ) एखादा फोटोमधून, देहबोलीमधून विषय कसा मांडला जाऊ शकतो?
६ ) कलाकारांचे फोटो , त्यांच्या आवडीचे अँगल्स ..
हे आणि असे अनेक मुद्दे मला विचारात घेता आले, त्यात गौतम सरांचे मार्गदर्शन सुद्धा असायचेच , म्हणून मला मी काढलेल्या फोटोवर, छापून आल्यावर सरांकडून, इतर लोकांकडून चांगल्यावाईट रिऍक्शन्स लगोलग मिळू लागल्या. असं बघा कि जसं रंगभूमीवर कलाकारांना ‘instant reactions’ मिळतात आणि त्यांना त्यांची भूमिका अभ्यासण्यासाठी किंवा plus – minus करण्यासाठी ते कामाला येतं, माझ्यासाठी सुद्धा हे काहीसं तसंच होतं. वृत्तपत्रासाठी फोटोग्राफ़ी हा एक उत्तम अनुभव असतो, आणि जमलं तर चांगलं करिअरसुद्धा… हळू हळू मेनका – माहेर – लोकमत अशा मॅगझिन्ससाठी सुद्धा कामे करू लागलो. सरांच्या सांगण्याप्रमाणे नंतर माझा फोकस ‘portraits’कडे वळवला. कमर्शियल फोटोग्राफी जास्ती करू लागलो.
हल्ली DSLR कॅमेरा हातात असलेल्या माणसाला माकड म्हणतात; मी तर म्हणतोय एक नाही तीन माकडे म्हणा…
ती सुद्धा उत्तम शिक्षक आहेत.
तोंडावर हात ठेवलेलं माकड – कामाच्या वेळेला बडबड नाही करायची, फक्त काम करायचं.
कानावर हात ठेवलेलं माकड – आपल्याबद्दल कोणी चांगले-वाईट बोलताय का? हे न ऐकता काम करायचं.
डोळ्यावर हात ठेवलेलं माकड – सर्वांनाच जे दिसतं ते तसं न पाहता creatively कसं वेगळं पाहायचं… त्याच प्रमाणे फोटो हा डोळ्यांच्या आधी मनात आणि विचारात आला पाहिजे.
२०१४ पासून ‘ झी टॉकीज ‘ साठी कॅलेंडर शूट करायला मिळालं, त्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांकडून शाबासकी मिळाली… त्या सर्व वर्षांत ह्या सर्व अभिनेत्री मैत्रीखातर माझ्या मदतीला धावून आल्या .. ..
२०१७ साली सैनिकांवरील कॅलेंडर आणि २०१६ साली केलेल्या निलेश कुलकर्णींच्या ‘IISM ‘साठी केलेल्या राष्ट्रगीतासाठी केलेले शूट हे माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामधील सर्वात जवळचा प्रोजेक्ट समजतो …. फोटोग्राफरने सुद्धा सैनिकांसारखं असावं .. ‘ focused & shoot at time ‘ ,, त्यांच्या गोळ्यांप्रमाणेच कॅमेऱ्याच्या ‘ shutter count ‘ ला खूप ‘किंमत ‘ आहे ..
सरांप्रमाणेच माझ्या प्रवासात काही माणसे आली आणि खूप सुंदर गोष्टी शिकता आल्या .. आणि माझा प्रवास अधिक खुलत गेला .. मी मराठी सिनेमाचा निस्सीम चाहता असल्यामुळे माझी खूप इचछा होती की आपण ह्या ज्या कलाकारांना TV वर बघतो त्या कलाकारांचे फोटो काढायला मिळावे … , आज ती इचछा बऱ्याच अंशी पूर्ण झाली. पर्सनल फोटोशूट , advertising commercial job , कॅलेंडर शूट्स ,नाटक- सिनेमांच्या पब्लिसिटी ह्या सर्व माध्यमांतून कलाकारांना भेटता आले, त्यांना अधिक जाणून घेता आले, त्यांच्याकडून शिकता आले..
खूप आधी एका दसऱ्याला मला ‘ प्रिया बापट’ भेटली, ती माझी शाळेपासूनची मैत्रीण, आम्ही शाळेत विशेष असे बोललो नाही,, कॉलेजेस् वेगवेगळी होती पण आम्ही सर्व माजी विद्यार्थी दसऱ्याला शाळेत एकत्र जमायचो.
एका दसऱ्याला प्रिया म्हणाली , “आपल्या वर्गातील अनेक मैत्रिणींचे फोटो काढलेस , माझे का नाही काढलेस ? ” मी म्हणालो ” तू स्टार आहेस आणि तुला डायरेक्ट कस विचारावं म्हणून जरा गप्प बसलो होतो. “ती ( कपाळावर हात मारत ) म्हणाली ” मी स्टार आहे का नाही माहिती नाही पण तुझी मैत्रीण नक्कीच आहे, मी परवा तुझ्या घरी येते आहे, माझे फोटो काढायचेस चुपचाप.”
हा मुद्दा मुद्दामहून सांगतोय कारण एखाद्या कलाकाराचे , स्टार्स चे फोटो काढताना तुमच्यावर tension आले तर काही वेळेला गोंधळ होतो.तिने आल्या आल्या मला सांगितलं कि “पुढे सुद्धा तू फोटोग्राफीमध्ये करिअर केलस तरी उगाच टेन्शन घेऊन काम नाही करायचं, समोर कितीही मोठा कलाकार का असेना , चांगल्या कामासाठी तू काही वेळेला त्या कलाकाराशी मित्र म्हणून मोकळेपणाने वागत जा आणि समोरील माणूस जसा कलाकार आहे तसाच फोटोग्राफर हा कॅमेऱ्या मागचा कलाकार असतो मग तू कशाला घाबरतोस ? ” !! तो सल्ला खूप कामाला आला.
सई ताम्हणकर – २०१३ – मी फोटो काढतो हे सई ला माहिती होतं पण का कोणास ठाऊक तिला माझं नाव ‘सचिन’ आहे असं वाटत होतं.. एका मोठ्या कार्यक्रमात मला म्हणाली, ” सचिन तू मस्त फोटो काढतोस , कीप इट अप ” .. मी नंबर एक्सचेंज केला आणि म्हणालो की माझं नाव तेजस आहे सचिन नाही.. ती हसत सॉरी म्हणून निघून गेली .. मी पण विचार केला की ही इतक्या लोकांना भेटते , माझे नाव हिने का लक्षात ठेवावे.. ? असो.. पण बाईचा रात्री १२.३० ला फोन आला .. आणि म्हणाली ” सॉरी तेजस पण मी मुद्दामहून नाही म्हणाले ,माझं नाव चुकलं असेल पण तुझ्या कामाचं कौतुक नक्की करायचं होतं .. जरा गडबडीत होते , लवकरच भेटू . बाय “मला क्षणभर कळेना की काय चाललंय ,, ही इतकी मोठी अभिनेत्री , इतक्या छोट्याश्या गोष्टीवरून मला रात्री फोन करून का सांगतेय ? पण लेट मी टेल यु ऑल, that’s सई !!! एक प्रॉफेशनल म्हणून तुम्ही नुसत्या कामात नाही तर इतरवेळी सुद्धा किती ‘प्रॉम्प्ट’ असावं.. हे शिकायला मिळाले .. तिच्याबरोबर खूप शूट्स करता आले. तिचा तो वावर, प्रत्येक टेक्निशियन ते स्पॉटबॉयबद्दलचा आदर आणि बोलायची अदब.. इतक्या उंचीवर जाऊन सुद्धा तिचे पाय जमिनीवर आहेत…..,. एक फोटोक्लिकर म्हणून सहकाऱ्यांचा केलेला आदर तुमचे काम अजून बहरवतो हे शिकण्यासारखं आहे….
अमृता खानविलकर – एक वादळ येतं , मी त्याचे फोटो काढतो आणि ते जातं,, “that’s amruta”, for you guys !!! ‘ no nonsense ‘ थिअरी म्हणजे अमृताचं शूट .. आणि म्हणूनच तिचे शूट्स म्हणजे फोटोग्राफर साठी एक अक्खी लर्निंग प्रॉसेस आहे… ह्या बाईचे फोटो काढता आले आणि शिकायला मिळाले की फोटोग्राफरने त्याच्या कामात किती ‘क्विक ‘ असावं ? थँक्स ‘A’
फोटोग्राफर म्हणून नुसते खूप चांगले फोटोग्राफ्स बघणे किव्हा त्यावर विचार करणे हे नव्हे तर माणसे वाचण्याचासुद्धा प्रयत्न केला तर फोटोग्राफी अजून एन्जॉय केली जाऊ शकते. खालील काही दिग्गजांनी मला कळत नकळत खूप काही शिकवलं – ही माणसे कॅमेऱ्याच्या दोन्ही बाजूला असणारी माणसे आहेत.. आणि ह्यांचे अनुभव सुद्धा कामाला आले … आपल्या आवडत्या कलाकारांबद्दलच्या अनेक गोष्टी – किस्से लवकरच तुम्हा सर्वांशी ‘share ‘ करणार आहे … इथे शब्द मर्यादा आहे म्हणून ….
प्रयोजन इतकेच कि मला अनेक वेळेला प्रोफाइल शूट – फोलिओ शूट साठी विचारणा होते, तसेच असिस्टंटशिप साठी फोटोग्राफर मित्रमैत्रिणींचे ‘messages’ येतात , माझ्या प्रमाणेच त्यांना सुद्धा ह्या अनुभवांचा फायदा होईल .. आपल्या ह्या मराठी इंडस्ट्रीने कॅमेऱ्याच्या अलीकडलं – पलीकडलं खूप शिकवलं , त्यातलीच काही नावं ..
महेश मांजरेकर ,महेश लिमये , रवी जाधव , संजय जाधव , अवधूत गुप्ते , अभिजीत पानसे , केदार शिंदे, आदित्य सरपोतदार ह्यांच्यासारखी मातब्बर मंडळी,… सोनाली कुलकर्णी (sr) , अश्विनी भावे , माधुरी दीक्षित , भरत जाधव , उमेश कामत – प्रिया बापट – सई – स्पृहा जोशी -अंकुश चौधरी – आदिनाथ कोठारे- उर्मिला – पूजा सावंत – तेजस्विनी पंडित – सोनाली कुलकर्णी – वैभव तत्ववादी – सखी गोखले – अमेय वाघ तसेच अजिंक्य रहाणे , रोहित शर्मा , आर अश्विन , अजित तेंडुलकर सर , पं. शिवकुमार शर्मा, पं हरिप्रसाद चौरसिया , अशी माझ्या पुस्तकातील सर्व मंडळी … खूप मोठी लिस्ट आहे अहो !!!
खूप लिहायचं राहिलंय , पण माझ्या ‘pen ‘ मुळे तुम्हाला अजून ‘pain ‘ देऊ इच्छीत नाही ( हसा ! ) शेवटी … माझ्या सारख्या सर्व नवीन फोटोग्राफर्सना आणि ह्या क्षेत्रात नवीन येऊ पाहणाऱ्या मॉडेल्स / अभिनयात करिअर करायचे आहे; ह्या सर्वांशी एक गोष्ट ‘share ‘ करायला आवडेल.. ज्याचा मला उपयोग झाला ..’स्वप्न आणि सत्य ह्यांच्या मधील प्रवास म्हणजे ‘ struggle ‘ ,, तो तेवढा प्रामाणिकपणे व्हायला हवा ‘माझे गुरुजन आणि प्रवासात भेटलेली सर्व मंडळी ह्यांच्यामुळे ‘ब्रॉड गेज ‘ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय , स्वप्नं पाहणाऱ्या नवीन कलाकारांसोबत आणि सत्यात उतरलेल्या जाणत्या मंडळींसोबत पुढचा ‘ बुलेट ट्रेनचा’ प्रवास करायला आवडेल …..
ह्या प्रवासातील काही मजेशीर अनुभव सुद्धा सांगतो (वाटलं तर काहीसं कॉमेडी , खोचक , तिरसट काय हवं ते समजा ) – थोडक्यात मांडतो. नाटकी काव्यमय रूपात
(कुठल्याही फोटोग्राफर चे मनोगत)
फार हसायला येतं …
फार हसायला येतं
जेव्हा ८०००० चा मोबाईल घेणारे लोक फोलिओ साठी बजेट नाही म्हणतात तेव्हा
शूट नंतर च्या पार्टी मध्ये पैसे उडवतात तेव्हा ..
मी किती महत्वाचा वाटतो सांगून , लग्न , पार्टी ला ये- फक्त येताना कॅमेरा घेऊन ये सांगतात तेव्हा
आणि dslr कॅमेरा पेक्षा फक्त त्यांचेच सेल्फी कसे चांगले आले आहे हे सांगतात तेव्हा
एक दुसरीच्या फोटो ला नावे ठेवते तेव्हा
आणि पार्टीत तिच्याच गळ्यात गळे घालून सेल्फी काढते तेव्हा
स्वतः बेढब असताना फोटोशॉप वर आम्हाला बारीक कर सांगतात तेव्हा
आणि मुलाखतीत ” i am so original ” असे म्हणतात तेव्हा
he is a monkey with dslr असे छद्मी पणे म्हणतात तेव्हा
आणि स्वतः स्नॅपचॅट वर सेल्फी काढताना , कोल्हा, ससा , गाढव बनतात तेव्हा …
-Written by – तेजस नेरुरकर [फोटोग्राफर]
[pssc_all] Shares