आज नाटक पहा पैसे नंतर द्या…
८ नोव्हेंबर २०१६, संध्याकाळी TV बंद होता. घरी एक मित्र आला होता, गप्पा मारत बसलो होतो. अचानक मोबाईल खूप टिंगटिंगू लागला. Whatsapp message चा इशारा देत होता. परत एखादा जोक बाजारात नवीन आला असेल (Whatsapp च्या बाजारात) असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. थोड्यावेळाने मित्र गेला आणि मी दोन नोटिफिकेशन्स मोबाईलवर वाचली,
१. ५००, १००० च्या नोटा बंद… (मला हसू आलं)
२. Watch PM addresses the nation… Now,
त्वरित, तात्काळ, ताबडतोब माझा हात रिमोटकडे गेला. By default एक entertainment चॅनल सुरु झालं, ते बदलून न्यूज चॅनल लावलं आणि पुढील संपूर्ण भाषण मी पूर्ण मन लावून ऐकलं आणि अवाक झालो. ‘आज रात्री १२ वा. पासून १०००/- आणि ५००/- च्या नोटा बंद होणार. TV वर भाषण चालू असताना स्क्रीनवर खाली फ्लॅश होत होतं, ‘काळ्या पैशावर मोदींचा सर्जिकल स्ट्राईक.’
मी आधीच मोदींचा मोठ्ठा फॅन, माझ्या बाबतीत गेल्या वर्ष दोन वर्षात काही unjust असे प्रसंग घडले तेव्हा मला थेट त्यांना पत्र लिहावसं वाटलं, कारण त्यांच्यावर विश्वास की तेच नक्की काहीतरी करू शकतील आणि करतील. TV वर न्यूज चॅनलवर लगेच चर्चाही सुरु झाल्या उलटसुलट. मी घरी बसून विरोधात बोलणाऱ्यांना मनातून शिव्या देत त्या ऐकत होतो. पण मनाच्या दुसऱ्या कोपऱ्यात हे खरंच शक्य होईल का? अशा प्रश्नांशी झुंजातही होतो. इतका मोठ्ठा आपला देश, त्यातील बरेच धनाढ्य मोदीजींच्या मांडीला मंडी लावून अनेक प्रसंगी बसलेले देशाने पाहिलेत. अशा सगळ्यांना हे एकटे शिस्त आणि शासन करू शकतील? काही टक्क्यांनीच का होईना पण माझं सकारात्मक मन ‘हो’ असाच कौल देत होतं.
दिनांक ९ आणि १० रोजी बँका बंद असणार होत्या आणि सुरुवातीच्या काही दिवसात पैसे बदलून घेण्यावर मर्यादा असणार होती. अचानक लक्षात आलं आपल्याकडे खर्चाला किती वैध नोटा आहेत पाहिलं पाहिजे. नशिबाने माझा तो प्रश्न पुढील २ दिवस नाही तर आठवड्याभरासाठी सुटला. दुसऱ्या दिवसापासून वाणी म्हणाला पैसे देऊ नका महिना अखेरीस चेक द्या. दूधवाला महिन्यावरच होता. सगळी बिलं चेकनेच देत होतो. त्यामुळे इतर बारीक सारीक खर्च manageable होते. मी अजून खुश झालो आणि दुपारच्या सुमारास फोन आला. माझ्या नाटकाच्या, अमर फोटो स्टुडीओच्या मॅनेजर नितीन नाईकचा की ११ तारखेच्या वाशीच्या प्रयोगाला फक्त ६ ते ७ तिकिटं गेली आहेत. Online ही तितकीच. ९ आणि १० तारखेचे अनेक नाट्य प्रयोग लोकांनी cancel केलेत आणि मी हबकलो. आता पर्यन्त ज्या निर्णयाचं मी कौतुक करत होतो तो खरंच बरोबर आहे का? हा प्रश्न मला पडला कारण त्याची झळ आता माझ्या लक्षात अली होती. पण अशावेळी पटकन react न होता शांत बसणे मी प्रेफर करतो. शांत बसलो विचार केला नितीनला फोन केला आणि सांगितलं एक दिवस वाट पाहूया उद्या १० तारीख आहे आपला ११ तारखेला प्रयोग आहे, जर परिस्थिती सुधारली नाही तर आपणही प्रयोग रद्द करू. दुसऱ्या दिवशी आम्ही प्रयोग रद्द केला.
‘अमर फोटो स्टुडीओ’ आत्ताच्या घडीचं चालू असलेल्या नाटकांमधलं बरं बुकिंग असलेलं नाटक. नाटक उत्तम आहे अशीही चर्चा नाट्यवर्तुळात आहे, प्रेक्षकांमध्ये नाटक पाहण्याची उत्सुकताही आहे, अशावेळी प्रयोग होत राहणं आवश्यक असतं, ते थांबवून चालत नाही. त्यामुळे त्या आठवड्यातील प्रयोग cancel झाला तरी पुढील प्रयोग झालेच पाहिजेत ह्या विचारावर मी ठाम झालो आणि मग सुरु झाले रोख पैसे न घेता तिकिट विक्री कशी करावी? याचे विचार. Online चा पर्याय पाहिल्या क्रमांकावर होता पण लोक अजून त्या पर्यायाकडे वाळलेले नाही आहेत. आता वाळवंच लागेल. दुसरा पर्याय credit/debit कार्ड, पण आपल्या नाट्यगृहाच्या बुकिंग कॉउंटरवर Card Swipe Machine ची व्यवस्था नाही, त्यामुळे ती व्यवस्था करायला हवी. मग मला असं वाटलं की चेक पेमेंट घ्यायला काय हरकत आहे? म्हणून मी तोही पर्याय प्रेक्षकांना द्यायचं ठरवलं. ह्या सगळ्या पर्यायांचा विचार करताना, या प्रेक्षकांच्या वयोगटाचाही मी विचार करत होतो. ऑनलाईन बुकिंग करणारी सगळी मंडळी प्रामुख्याने मध्यमवयीन, तरुण असतील. Credit/Debit कार्ड वापरणारी ही तीच. वयस्कर मंडळी यातील कुठलाच पर्याय कदाचित नाही वापरू शकत म्हणून चेकचा पर्याय हा त्यांच्यासाठी सोईस्कर होता. पण मग कॉलेजगोइंग विद्यार्थी वर्गाचं काय? अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे ह्या दिल दोस्ती दुनियादारीच्या टीमचे अनेक फॅन्स हे Teens मधले तरुण आहेत, जे आपल्या Pocket Money मधून पैसे वाचवून नाटकाला आणि त्यांना बघायला, भेटायला येतात. त्यांच्यासाठी काय पर्याय आहे?
म्हणून मग ठरवलं की त्यांनी आज नाटक बघावं आणि नंतर पैसे आणून द्यावे. ह्या नाटकात ‘सुबक’ बरोबरीने ‘कलाकारखाना’ ही संस्था जोडली गेली आहे. त्याच्या निर्मात्यांना म्हणजेच सखी गोखले, अमेय वाघ आणि सुव्रत जोशी ह्यांच्याशी चर्चा केली व त्यांनीही माझ्या ह्या कल्पनेला दुजोरा दिला. खूप जणांनी विचारलं नंतर पैसे देतील का? पण इतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवावरून मी हे सांगू शकतो की मराठी नाटकाला येणार प्रेक्षक हा कधीच विश्वास टाकल्यावर कोणालाही फसवणार नाही. माझा ‘हर्बेरियम’ हा अख्खा उपक्रम त्यांनी दाखवलेल्या विश्वासावर मी करू शकलो होतो. १९ नोव्हेंबर रात्री कोथरूडला आणि २० नोव्हेंबर दुपारी बोरिवलीला असे दोन प्रयोग होते. त्याच्या जाहिराती यायच्या होत्या. मी आमच्या डिझायनरला ओळी लिहून पाठवल्या.
‘आज नाटक पहा, पैसे नंतर द्या
आमचा आमच्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आहे.
तुम्ही तिकिट्स credit/debit कार्ड, tickitees.com , चेकनी किंवा वैध नोटा रोख देऊन काढू शकता. पण जर हे नसेल तर आज नाटक पहा पैसे नंतर द्या. एक नक्की नाटक रोख आणि खणखणीत दाखवू.’
ह्या कल्पनेचं अनुकरण आणि कौतुक खूप झाले. पण सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला की एकाही प्रेक्षकाने ह्या योजनेचा गैर फायदा घेतला नाही. तिकिट खिडकीवर एकही प्रेक्षक असा आलाच नाही जो म्हणाला मी नंतर पैसे देतो.
मी खूप सुखावलो. आपण विश्वास ठेवला आणि सकारात्मक राहिलो तर काही वाईट होऊ शकत नाही ह्या विचारांवर मी अजून दृढ झालो.
मगाशी म्हंटल्या प्रमाणे मोदीजींच्या ह्या क्रियेला सुद्धा माझ्या सकारात्मक मानाने कौल दिला होता. तसंच घडो हीच इच्छा.. जय हो!!
-Written by – Sunil Barve
[pssc_all] Shares